The card distribution process of ‘Ayushman Bharat’ and ‘Mahatma Phule Jan Arogya Yojana’ should be speeded up
‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे कार्ड वितरण प्रक्रियेस गती द्यावी
– केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत
मुंबई : केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज दिले.
केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना निर्देश दिले.
पुढील वर्षी नियोजित पीआयपीचे (प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन) प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना देत आरोग्य सचिव श्री. पंत म्हणाले की, पीआयपी व पीएम अभिम अंतर्गत जास्तीत जास्त निधी खर्च करावा. दर्जेदार काम आरोग्य क्षेत्रात उभारावे. जेवढा जास्त खर्च कराल, तेवढा निधी केंद्र शासनाकडून मिळेल. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी.
बैठकीत आयुष्मान भव मोहीम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच राज्य शासनाचे विविध निर्णय, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणारा निधी व झालेला खर्च, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, वैद्यकीय शिक्षण विभागाचे निर्णय आदींचाही आढावा घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com



One Comment on “‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे कार्ड वितरण प्रक्रियेस गती द्यावी”