Maharashtra’s Chitrarath will see three and a half Shaktipeeths in the state.
महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात, महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन
नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारीला भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी, कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रासह १७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे एकूण २३ चित्ररथ सहभागी होणार आहेत.
यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथावर कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध अशा साडेतीन शक्तिपीठांचा देखावा साकारला जाणार आहे.
यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते.
पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्यापरीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.
यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासियांना घरबसल्या होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी दिली आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.
महिला शक्ती ही यंदाच्या संचलनाची मध्यवर्ती संकल्पना असेल, त्यामुळे त्यामुळे नौदल,हवाई दल आणि सैन्य दलांच्या पथकांचं नेतृत्व महिला अधिकारी करणार असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com



One Comment on “महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन”