India beat West Indies by 6 wickets in 1st ODI.
पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्टइंडीजवर ६ गडी आणि २२ षटकं राखून विजय.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज अहमदाबाद इथं झालेला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं ६ गडी आणि २२ षटकं राखून जिंकला. याबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.
आजच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत, तेवीसाव्या षटकात वेस्टइंडिजची अवस्था ७ गडी बाद ७९ अशी केली होती.
भारताकडून युझवेंद्र चहलने चार तर वॉशिंग्टन सुंदरने तीन बळी घेतले. प्रसिध कृष्णाने दोन आणि मोहम्मद सिराजने एक बळी घेतला.
होल्डर ५७ धावा करून बाद झाल्यावर मात्र वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ ४३ षटकं ५ चेंडूंमध्ये १७६ धावांमध्येच माघारी परतला.
प्रत्युत्तरात भारतानं २८ षटकांमध्येच ४ गड्यांच्या मोबदल्यात १७८ धावा करत सामन्यात विजय मिळवला. भारताच्या वतीनं कर्णधार रोहीत शर्मा यानं सर्वाधिक ६० धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज गायिका – लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करत भारतीय खेळाडूंनी हातावर काळ्या पट्टी बांधल्या होत्या.
एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील 1000 एकदिवसीय सामने खेळणारा भारत हा पहिला संघ बनला असला तरी, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संघाने हा ऐतिहासिक क्षण साजरा केला नाही.
