MoU Signed between Ministry of Tourism and Alliance Air Aviation Limited on Cooperation for Promotion & Marketing of Domestic Indian Tourism
पर्यटन मंत्रालय आणि अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेड यांच्यात देशांतर्गत भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन आणि विपणन सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : देशभरात पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने 17 फेब्रुवारी, 2022 रोजी नवी दिल्ली येथे अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेड बरोबर सामंजस्यकरार केला. पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाच्या वतीने अतिरिक्त महासंचालक रुपिंदर ब्रार आणि मेसर्स अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत सूद यांनी संयुक्तपणे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
अलायन्स एअर भारत सरकारच्या “प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेला ” (RCS) प्रोत्साहन देण्यात आघाडीवर आहे, या योजनेला पंतप्रधानांच्या उडान- (उडे देश का आम नागरीक) योजनेंतर्गत चालना दिली जात आहे. एकात्मिक विपणन आणि प्रोत्साहनात्मक धोरण तसेच अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडच्या संयुक्त सहकार्याने एकत्रित मोहीम राबवणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे .
प्रोत्साहनात्मक प्रयत्नांच्या विशिष्ट घटकांमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील जाहिराती, मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग, चर्चासत्रे, कार्यशाळा, रोड शो आणि इंडिया इव्हनिंग्ज, माहितीपत्रक /संयुक्त जाहिरात, आदरातिथ्य कार्यक्रमांतर्गत देशाला भेट देण्यासाठी माध्यमांना आमंत्रित करणे आणि ट्रॅव्हल ट्रेडचे आयोजन यांचा समावेश आहे. या सामंजस्य कराराचा लाभ घेण्यासाठी पर्यटन मंत्रालय संबंधित हितधारकांना एकत्र आणणार आहे.
