Virtual Marathi Literary Conference on 20th and 21st January
आभासी मराठी साहित्य संमेलनाचे २० व २१ जानेवारी रोजी आयोजन
पुणे : भाषा संचालनालयाच्यावतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणपिढीला मराठी भाषेकडे आकर्षित करण्याच्यादृष्टीने साहित्य अकादमी पारितोषिक विजेते व सुप्रसिद्ध कांदबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली २० व २१ जानेवारी रोजी आभासी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्धाटन भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे. २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री. खोत यांची मुलाखत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे घेणार आहेत. कवी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागर बोलीचा : बोली भाषा’ कवी संमेलनाचे आयोजन रात्री ८ वा. होणार आहे. यामध्ये वीरा राठोड (बंजारा), डी.के.देशमुख (दख्खनी), संतोष पावरा (पावरा), तुषार पाटील (अहिराणी), गोपीचंद धनगर (तावडी), योगेश महाले (डांगी), सुनील गायकवाड (भिल्ली), प्रवीण पवार (वाघरी) आणि राजश्री भंडारी (आगरी) हे कवी सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २१ जानेवारी रोजी ‘मी आणि माझे लेखन’ या विषयावर सकाळी १० वा. परिसंवादाचे आयोजित करण्यात आले असून यामध्ये युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथा-कांदबरीकार प्रणव सखदेव व कवयित्री विशाखा विश्वनाथ या सहभागी होणार आहे. वाङ्मयीन संस्कृतीवर आधारित मराठी कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांचे स्वतंत्र व्याख्यान दुपारी १२ वा. आयोजित करण्यात आले आहे.
गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावरील केंद्रीत कवितांचा ‘काव्यवंदना’ या विशेष कार्यक्रमाचे संध्या ५ वा. आयोजन करण्यात आले असून यामध्ये ज्येष्ठ कवी डॉ. प्रदीप आवटे, कवयित्री अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन यांचा सहभाग तसेच ‘साहित्य आणि कलेचा धर्म’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक आणि वक्ते गौतमीपुत्र कांबळे समारोपाचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत.
या संमेलनाचे https://youtu.be/8Cs-p83aJyQ या युट्युब लिंकवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. .रसिक श्रोते, नागरिकांनी मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाषा संचनालयाच्या मराठी भाषा विभागाच्या संचालक विजया डोनीकर यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com



One Comment on “आभासी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन”