गोसीखुर्द जलाशय येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन विकसित करण्यात येणार

Maharashtra State Tourism Development Corporation MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

World class international water tourism will be developed at Gosikhurd Reservoir

गोसीखुर्द जलाशय येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन विकसित करण्यात येणार

गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता

मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत गोसीखुर्द येथे जलपर्यटन, नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्प यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. गोसीखुर्द जलाशयात ४५ किमी जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन विकसित करण्यात येणार आहे.

देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून याठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदीर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

एमटीडीसीच्या माध्यमातून लोणावळा कार्ला येथे करण्यात येणारे एमआयसीई सेंटर आणि चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स संदर्भात सादरीकरण करण्यात आले. कार्ला येथील एमटीडीसी पर्यटक निवासाला एमआयसीई (मिटींग, इन्सेटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झीबिशन) सेंटर करण्यात येणार आहे. मुंबईच्या जवळ हा परिसर असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्यांना याठिकाणी दर्जेदार सुविधा मिळायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोयना बामणोली येथे स्कुबा डायव्हिंग तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नागपूर येथील सोनेगाव तलावाच्या सुशोभीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील गजबा देवी मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला. भाविकांसाठी चांगल्या सुविधा देतानाच बगीचे, रस्ते करून पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *