मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध

Drama -logo

Committed to energizing the Marathi theater sector

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

१०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहूर्तमेढ

  • राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणारMinister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सांगली  : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

१०० व्या नाट्य संमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

१०० व्या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीची नाट्यपंढरी अशी ओळख असून, १०० व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ असल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सध्या रंगभूमीसमोर इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांचे आव्हान उभे आहे. मात्र, नाटकांची क्रेझ पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नाट्य संमेलनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपणही सांगलीचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिरास सी.एस.आर. मधून वातानुकुलित यंत्रणेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

१०० व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीत होत असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त करून स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, समस्त सांगलीकर आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांच्यामुळे सांगलीची ओळख नाट्यपंढरी म्हणून निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

सध्या नाटकांच्या प्रयोगांमुळे सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यायला मिळते, असे सांगून ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांची देखभाल, अद्ययावत नाट्यगृहांमध्ये सोलर सिस्टीम व नवोदित कलाकारांची मुंबईत निवास व्यवस्था व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, कलाकार म्हणून आम्हीही आमची जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित भुरे यांनी मनोगत व्यक्त केले.

मुकुंद पटवर्धन म्हणाले, दिग्गज कलावंत सांगलीत घडले. सांगलीत हे पाचवे नाट्य संमेलन होत आहे. १०० वे नाट्य संमेलन विभागवार ६ ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख एकच व्यासपीठावर आले आहेत. यातून रंगभूमीला नवी दिशा, विचार व नजर मिळेल. सांगलीची आलौकिक नाट्यपरंपरा पुन्हा प्रकाशमय होत असल्याचे ते म्हणाले.

नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नांदी सादर करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शमी, आंबा व उंबराच्या फांद्यांना मुहूर्तमेढ बांधण्यात आली. तसेच संहितापूजन करण्यात आले. प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून मुहूर्तमेढ करण्यात आली. सदर घंटा ६ विभागीय संमेलनात वाजवली जाणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ यांच्या १० नाट्यकृतींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारप्राप्त डॉ. तारा भवाळकर, सदानंद कदम, पंडित हृषिकेश बोडस, शाहीर देवानंद माळी यांचा श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता
Spread the love

One Comment on “मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *